मध्यंतरी एक चांगला लेख वाचण्यात आला होता, चांगली आई. चांगली आई म्हणून स्वताला सिद्ध करताना स्वतच्या चांगल्या आईच्या कल्पना आणि मुलाच्या चांगल्या आईच्या कल्पना ह्यात तफावत होती. त्यमुळे साहजिकच मनात येणारे निराशाजनक विचार ह्याचा त्यात बराच उहापोह होता.
  चांगल्या आईची व्याख्या हि प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळी असेल पण आपल्या मनाप्रमाणे चांगली आई बनण्याचं स्वातंत्र किती जणींना मिळत? हे स्वातंत्र जर का मिळाले असत तर कुठल्याही आईने अस निष्ठुरपणे निव्वळ मुलगी आहे म्हणून आपल्या बाळाला पोटातच नसत मारलं. खरच आपल्या मनाप्रमाणे मुल वाढवता याव एव्हढी छोटीशी अपेक्षा सुद्धा पूर्ण होवू नये?
  मुळात हि अशी अपेक्षा ठेवण चुकीचे आहे का? कदाचित आई म्हणून मुल वाढवताना कुठे काही
चुकलेच तर त्याचे परिणाम हे एका कळीचे फुलात रुपांतर होणाऱ्या व्यक्तीला भोगावे लागतील म्हणून इतर सगळे जण मध्ये मध्ये बोलत असतील. पण बाळ जस मोठे होत जात तसच माझ्यातली आई पण तर मोठी होत जाते. आई म्हणून चुकण्याचा किंवा आत्तापर्यंत न केलेल्या गोष्टी मी का नाही करू शकत? का माझ्या नवीन प्रयत्नांना प्रत्येकाला समजावून सांगावे लागते?

  माझ्या मुलीमध्ये पोहायचे चांगले गुण अवगत आहेत अगदी तिच्या शिक्षकांनी सुद्धा मानले आहेत. मी जेंव्हा तिला वर्षभरासाठी पोहण्याचा क्लास लावला त्यावेळी अगदी माझे आई-बाबा, सासू-सासरे, मित्र-मैत्रिणी आणि नवरा सगळ्यांनी मला वेडातच काढले. ती पोहायला जावू नये म्हणून हर प्रकारे प्रयत्न केला आणि मी आई म्हणून किती वाईट आहे ह्यावर एकमताने शिक्का मोर्तब झाले. अर्थात मी ह्या सगळ्या जणांकडे मी पूर्ण दुर्लक्ष करून तिला वर्षभर पोहायला पाठवले. "आई तू खूपच वाईट आहेस. माझ्यावर जबरदस्ती करतेस." असली मुक्ताफळ माझ्या लेकी कडून पण ऐकायला मिळाली. क्षणभर वाटले होते कि हि मला दुरावणार तर नाही. पण लगेच दुसरा विचार मनात आला कि तिच्या भल्यासाठी हे आवश्यक आहे. आज नाहीतर उद्या तिला नक्की समजेल. आज जेंव्हा तिला शाळेत certificates मिळाले त्यावेळी तिला खूपच आनंद झाला आणि आता ती पोहण्याचा आनद लुटते आहे.

  मी शक़्यतो जितक खंबीर राहता येईल तितक राहायचा प्रयत्न करते आहे पण असाच प्रयत्न माझ्या आईने मला आणि माझ्या भावाला वाढवताना केला होता का? आई मला म्हणाली कि मला तर तुम्हा दोघांना तुमच्या आजीवर सोपवून शाळेत जावे लागायचे. त्या काळी आम्ही काय आमच्या सासूबाईना सांगणार कि हे नको ते करा. त्यांच्या कितीतरी गोष्टी मला तर मुळीच पटायाच्या नाही. परीक्षेच्या आधी आजारी पडल म्हणून रंग खेळू द्यायचे नाही. पण आम्हाला काही बोलायची टाप नव्हती. मनात मात्र त्याच्या विषयी कधी राग नाही आला. तुमच्या काळजी पोटी त्या करत आहेत असे मी समजवायचे स्वताला. त्या होत्या म्हणून मी शाळेत निर्धास्तपणे नोकरी करू शकले. मला नाही माहित मी जे वागले ते बरोबर कि चूक पण मनाला माझ्या शांतता मात्र भरपूर होती. आज तुम्हाला दोघांना पाहून तर मला खंत तर अजिबातच वाटत नाही कि मी माझ्या मनाप्रमाणे तुम्हाला नाही वाढवू शकले.


  आईच्या ह्या विचाराने मी अजूनच गोंधळून गेले आहे. हे अगदी मान्य कि कुठलेही आजी, आजोबा आपल्या नातवंडाचे वाईट कधीच चिंतणार नाहीत. त्यांना हे कोण समजावून सांगणार कि पंखात बळ यायला काही काही वेळेला त्रासातून जावेच लागते. आजचा हा त्रास हा त्यांच्या उद्याच्या चांगल्यासाठी आहे. हे आजी-आजोबा समजत नाहीत आणि आई-बाबा त्यांना समजावून सांगू शकत नाहीत. ह्या विरोधाभासातून सुरु होते एक वेगळीच धुसफूस आणि त्याचा सगळा परिणाम हा त्या मुलांवर होत असतो. हा सगळा त्रास वाचवायचा असेल तर प्रत्येक आईला आपले मुल आपल्या मनाप्रमाणे वाढवू द्यावे.
तुम्हाला काय वाटते?

 - लेखिका : राजश्री जोशी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top