प्रेम या शब्दाची व्याख्या अजूनपर्यंत कोणीही बनवू शकलं नाही. जो तो आपल्या मनानुसार प्रेमाची व्याख्या बनवतो. प्रत्येकजण आपल्या जीवनात एकदा तरी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो. फक्त फरक एवढाच, की काहीजण आपलं प्रेम व्यक्त करतात आणि काही एकतर्फी प्रेमावरच जगतात. मलाही असंच काहीतरी जाणवलं, ते त्याला प्रथम पाहिल्यावर. कधीही प्रेमाचा खरा अर्थ समजलाच नव्हता. पण जेव्हा आमची नजरभेट झाली, तेव्हाच मी स्वत:चं मन अक्षरश: हरवून बसले. पहिल्यांदा मला वाटलं, या वयात मन चंचल असतं. जसजसं त्याला विसरण्याचा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत गेले, तसतसा तो मनात उतरू लागला. त्याचं माझ्याकडे बघणं, माझं त्याच्याकडे बघून लाजून हसणं, डोळ्यासमोर त्याचा आणि फक्त त्याचाच हसरा चेहरा दिसणं यालाच तर म्हणतात प्रेम! प्रेम व्यक्त करायला वेळ लागला, तो आम्हा दोघांमुळेच. प्रेमाची मागणी घालायला पुढाकार कोणी घ्यावा, हे सुचेना. शेवटी त्याला भेटायला गेले, तेव्हा दोघांनाही भावना व्यक्त करायच्या होत्या. मीच पुढाकार घेऊन त्याला मागणी घातली. त्याने होकार दिला. तो दिवस म्हणजे, 14 फेब्रुवारी 2010. त्याच्यातले अनेक गुण मला आवडतात. त्याचा माझ्यावर विश्वास आहे. तो मला खूप समजून घेतो. अनेक गोष्टी समजावतो. त्याच्यातील हट्टीपणा मला नाही आवडत. तो त्याने थोडासा कमी करावा. निलेश, जेवढा तू माझ्यावर प्रेम करतोस, त्यापेक्षा थोडं अधिक प्रेम मी तुझ्यावर करते. हे मला तुला सांगावं लागत आहे, याचं मला वाईट वाटतं. तू एकदा मला विचारलेला प्रश्न अजूनही माझ्या लक्षात आहे. त्या एका प्रश्नामुळे मला खूप रडायला येतं. पुन्हा असे काही वाईट शब्द तोंडातून काढू नकोस, की त्यामुळे तुझ्या या वेडाबाईला रडू येईल. फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमाची प्रेयसी.

- निलेशची निशा

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top