आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती. आता वेळ जाता जात नाही. पण सांगणार तरी कसं? तुला तर थांगपत्ताही नाही. तू आपला बेफिकीर, स्वच्छंद, आपल्याच मस्तीत असतोस. जगाकडे लक्ष द्यायला तुला वेळ कुठाय? ' मला 'नाही' ऐकायची सवय नाही,' हा तुझा हेका आणि जे हवंय ते मिळवायचा अट्टहास. माझे नियम वेगळे आहेत रे तुझ्यापेक्षा. तुझ्याइतकं फायदा-तोटा बघून नाही वागता येत मला. त्या क्षणाला जे वाटतं, ते करून टाकते मी. एका अर्थाने मीसुद्धा स्वच्छंदी आहे. पण तुझ्यासाठी तेवढीच हळवी, केअरिंग आहे. आजकाल 'मैंने प्यार किया'चं टायटल साँग मी अगदी तन्मयतेने ऐकायला लागलेय. स्वप्नात रमणं आवडतंय. कधीतरी अगदी खुश होऊन नाचावंसं वाटतं. बासरीच्या सुरांवर डोलावंसं वाटतं. कधी अचानक बेचैनी जाणवायला लागते, डोळे भरून येतात. इतक्या सहज माणूस प्रेमात पडतो? तू कधी प्रेम केलंस कुणावर? इतकं सुंदर, आश्वासक फीलिंग दुसरं कुठलंही नसेल. माहितीय, तुला सांगणं मला कधीच जमणार नाही. भीती वाटते, कुणी दुसरीच आवडत असेल तुला तर? नाही सहन होणार मला ते. त्यापेक्षा हे सीक्रेट माझ्यापुरतं राहूदे. फक्त माझ्यापुरतं! मनोमन वाट बघत राहेन तुझ्या विचारण्याची. पण नाहीच विचारलंस, तरी चालेल. रिमझिम पावसात भिजताना तू आठवतोस. असं वाटतं, आता अचानक मागून छत्री घेऊन येशील. 'किती भिजतेस?' असं म्हणून दटावशील आणि माझ्या हातात गरमागरम कॉफीचा कप ठेवशील. बघ, माझी मनोराज्य सुरू झाली. माझा आतला आवाज सांगतो, की तू कधीतरी येशील. मी दर पावसाळ्यात तुझी वाट बघेन. येशील ना?

- तुझीच

   आर्या

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top