आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते, की ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. जास्त विश्वास आपण त्याच्यावरच ठेवतो. तसाच माझ्या आयुष्यात गौरव आला. त्याला पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये पाहिलं आणि मैत्री करावीशी वाटली. फ्रेण्डशिप डेच्या दिवशी मैत्रीही केली. असं वाटायचं, की फक्त त्याला बघत बसावं. त्याचा हास्यचेहरा बघून मला अनोखा आनंद व्हायचा. पण त्याच्याशी बोलण्याची हिंमत व्हायची नाही. फक्त त्याचाच विचार करावा, त्याच्याशिवाय सोबत कोणीही नसावं, असं वाटायचं. मनातलं हे गुपित माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यांनी ते जाऊन गौरवला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही मला. या गोष्टीचं काहीच दु:ख नव्हतं. कारण त्याच्या जागी मी असते, तर माझंही उत्तर तेच असतं. ज्या व्यक्तीशी मी फक्त मैत्री केली आणि ज्याच्याबरोबर फारसं बोललेही नाही, त्याला पटकन 'हो' सांगणं कठीण आहे. तरीही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याला एक दिवस पाहिलं नाही, तर 'मी कॉलेजला का आले,' असं वाटायचं. त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठल्याच मुलाचे विचार येणं शक्य नाही. काही दिवसांनंतर गौरव आमच्या वर्गात येऊन बसायला लागला. नेहमी मागे वळून आमच्या बेंचकडे पाहायला लागला. त्याचं ते पाहणं, आमची नजरानजर झाल्यावर त्याच्या मित्राकडे बघून बोलणं, पुन्हा बोलता बोलता माझ्याकडे पाहणं असं त्याचं वागणं यातून माझ्या मनात त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाढलं. त्याच्या काही मैत्रिणी माझ्या वर्गात आहेत. त्यांच्याकडून गौरवबद्दल आणखी काही माहिती मिळाली. मला हे समजलं, की गौरवचं कोणत्याही मुलीबरोबर प्रेमप्रकरण नव्हतं. तो मैत्रिणींशी फक्त मैत्रीच्या नात्याने बोलतो. त्याचे आईवडील जी मुलगी शोधून देतील, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचंय, हे ऐकून माझ्या मनात गौरवसाठी जी इज्जत होती, ती अधिक वाढली. जो एका मित्राचं आणि मुलाचं कर्तव्य इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, त्याला चांगली व्यक्ती म्हणता येतं. प्रत्येक मुलगी हेच स्वप्न पाहत असते, की तिचा जोडीदार चांगला असावा. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. गौरवशी बोलण्याचा प्रयत्न माझा सुरूच होता. पण तो समोर आल्यावर माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत. त्याचं ते तिरप्या नजरेने पाहणं मला अस्वस्थ करतं. त्याचं त्याच्या मैत्रिणींशी जास्त बोलणं पाहून मला खूप वाईट वाटायचं. माझा उदास चेहरा पाहून माझ्या मैत्रिणीने त्याला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही. तो माझ्यावर प्रेम करत नसेल, तर? नसो, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, करते आणि करत राहणार. म्हणतात ना, खरं प्रेम असलं, की ती व्यक्ती स्वत:हून आपल्याकडे येते... माझं मन आजही त्याला पाहण्यासाठी, बोलण्यासाठी व्याकूळ झालेलं असतं. गौरव स्वत:हून माझ्याजवळ येईल, त्या क्षणाची मी वाट बघतेय. या जन्मी गौरव माझा झाला नाही, तर देवाला मी सांगेन, की पुढच्या जन्मी माझा साथीदार फक्त गौरव असावा...

त्याचीच,

- गौरवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top