बालभारती - आठवणीतील कविता

श्रवाण मासि

श्रवाण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी

:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::


मन -----

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

- बहीणाबाई चौधरी

:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::

फुलपांखरूं

फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

- ग.ह.पाटील


:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::

टप टप टाकित टापा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके



:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::

गवतफुला

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

- इंदिरा संत



:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::

लेझिम चाले जोरात


दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे



:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: :::

मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या परी,
मधुघटचि रिकामे पड़ती घरी

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पजीला तुला भरोनि,
सेवा हि पुर्वीची स्मरोनी,
करी रोष न सखया, दया करी

नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाचि माझ्या गाठी,
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशि तरी

तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी रे बळ न करी

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतीरी

- भा. रा. तांबे



:::::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: ::::::::: :::

घरटा

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

- बालकवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top